Thursday, 9 May 2013

टाईम टू रिचार्ज युवर नातीगोती


टचस्क्रीनच्या जमान्यात वावरणारी तुमची जनरेशन डोळ्याचं पातं लवतं न् लवतं तो तुमचा या विंडोतून त्या विंडोत संचार सुरु असतो पण खरोखरच्या विंडोमध्ये थकलेले चार डोळे तुमच्या येण्याची आतुरतेने वाट बघत असतात. अरे, कधीतरी टचस्क्रीनचा वापर न करता मनाने- शरीराने त्यांच्यासमोर  हजर व्हा. बघा, किती आनंद होईल त्या डोळयांना ! तो आनंद तुम्ही पाठवलेल्या पैशांपेक्षा किंवा महागड्या गिफ्टपेक्षा कितीतरीपटींनी जास्त असेल.

 ग्लोबलायझेशनच्या जमान्यात कार्पोरेट वर्ल्डमध्ये वावरणारी तुमची जनरेशन, खरच भरपूर काम करता त्यामुळे रिचार्ज व्हायला वीकेंड तर सिलेब्रेट करायलाच हवा पण रिचार्ज व्हायला कुठल्या रिसाँर्टमध्ये  न जाता एखादे दिवशी आपल्या मायेच्या घरी जाऊन बघा, नसेल तिथे मनसोक्त डुंबायला स्विमींग पूल कदाचित घरच्या वीजेनेही त्या दिवशी असहकार पुकारला असेल तेव्हा आईची किचनमधून हाक ऐकू येईल, अरे, गार पाण्याने अंघोळ करु नको, पटकन गँसवर गरम पाणी करुन देते. तेव्हा तुमच्या ब्रेनच्या मेमरी कार्डमधून तुमच्या बालपणीची आठवण बाहेर येईल अरे , आई लहानपणी सकाळची शाळा असतांना असेच पाणी तापवून द्यायची अन् तुम्ही नकळत भूतकाळात शिराल आणि तुमच्या  मेमरी कार्डमधून अशा अनेक आठवणी बाहेर येतील. या आठवणी आपल्या आई-बाबांशी शेअर करुन बघा आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल तो तुम्हाला पुढल्या आठवडयासाठी रिफ्रेश व्हायला नक्कीच पुरेसा असेल.

या घरात तुम्हाला पिझ्झा-बर्गरसारखे पदार्थ खायला मिळणार नाहीत पण आईच्या हातचे गरम-गरम लोखंडाच्या तव्यावरचे थालीपीठ मिळेल त्यावर आईने छान लोणी पसरले असेल. ते थालीपीठ खातांना मधून-मधून आईच्या नकळत तिच्याकडे बघा ,खरच ती माऊली तुम्हाला तृप्त दिसेल. तुमच्या मुलांना या घरात बाहेरच्यासारखे महागडे गेम खळायला मिळणार नाही पण येथे सगळे मिळून खेळून बघा कँरम, मांडा एखादा पत्त्यांचा डाव मग बघा कशी येते धमाल, जी तुम्ही तुमच्या लहानपणी अनुभवली असेल. घेऊ द्या रे तुमच्या मुलांना हे अनुभव ! घेऊ द्या रे त्यांना आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींची मजा , त्या कार्टूनफिल्मपेक्षा आजी-आजोबांनी समरस होऊन सांगितलेल्या गोष्टी तुमच्या मुलांना नक्की आवडतील अन् बहुतेक वीकेंडला मुले मागे लागतील बाबा आपल्या जुन्या घरी जाऊ या . येथे जेव्हा त्यांच्या तोंडून आपल्या घरीहा शब्द निघेल तेव्हा नक्कीच तुमची आपल्या जुन्या घराची तुटत जाणारी नाळ पुन्हा जुळेल आणि तुम्ही सर्वजण खरया अर्थानी सुखी व्हाल.

 अरे, पैसा-पैसा म्हणजे काही सर्वस्व नाही. आपल्या बिझी शेडयूलमधला जरासा वेळ द्या रे आपल्या आई-बाबांना, जपा रे मुलांनो नाती, ती निर्लेप होऊ देऊ नका ,त्यावर लाखंडी तव्याचा चिकटपणा राहू द्या म्हणजे ती अधिक घट्ट होतील.   

Friday, 5 April 2013

आपुलकीचे गाठोडे




   आपुलकीचे- आठवणींचे गाठोडे अधून-मधून उघडून बघावं. त्यात असते आईच्या मायेची उबदार शाल,   आजीच्या प्रेमाची गोधडी, बाबांचा वरुन बोचणारा पण आतून कापसासारखा मऊ मफलर, दादा-ताईचा मित्रांशी भांडल्यानंतर प्रोटेक्शन देणारा उबदार ओव्हरकोट. अशा अनेक आठवणी या आपुलकीच्या गाठोड्यात आपल्याला दिसतील. त्या गाठोडयाची गाठ सोडतांना आठवणींची गुंतागुंत होईल पण त्या गुंत्याची निरगाठ होऊ देऊ नका कारण एकदा का निरगाठ झाली की ते आपुलकीचे आठवणींचे गाठोडे कायमचे बंद  होईल पण तुम्ही असे करु नका. गाठीची अधिक गुंतागुंत न करता तो आठवणींचा साठा नेहमी नाही बरं अधून-मधून कधीतरी उघडा कारण सारखे जर  आपण त्या गाठोडयात गुंतलो तर वर्तमानाशी आपण सांगड घालू शकणार नाही. कधीतरी हे गाठोडे उघडा त्या गाठोड्यातील तो अमूल्य खजिना वर्तमानात आपल्या  जुन्या आठवणींना नक्कीच उजाळा देईल आणि आपली वर्तमानाची वाट त्यातील प्रेमळ स्पर्शाने सुखकर होईल.
 

Tuesday, 2 April 2013

मी गार्गी- मीच लक्ष्मी


मी स्वतःस मी कोण?

असा प्रश्न केला

मला माझाच भूतकाळ आठवला

मीच होते गार्गी, मीच होते लक्ष्मी

मग आज मी कां अशी?

शोधू लागले मी हरवलेले स्वत्व

गवसले मला माझे अस्तित्व

अजूनही मी आहे  गार्गी मीच ती लक्ष्मी

फक्त पुरुषी वर्चस्वाने खुंटली आहे माझी मती

मला आता लागला माझ्या अस्तित्वाचा शोध

आता मला जायचे पुढे याचा मला झाला बोध

जुन्या नव्याचा मेळ साधत

तंत्रज्ञानाची करुन संगत

घेईन मी भरारी

सिद्ध होईल मीच ती आहे गार्गी- मीच आहे ती लक्ष्मी. .